पंढरपूर – विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१६ मतदारांपैकी एकट्या भाजपकडे ४५० च्या आसपास मतदार आहेत. या शिवाय शिवसेना शिंदेंची, अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीची संख्या जास्त आहे. तर विरोधकांकडे संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध करून इतिहास घडवावा असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरपूर इथे आषाढी वारी आणि महाराज मंडळींची भेट घेण्यासाठी आले होते. त्या नंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
——————-
सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत गोरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी एकूण ६१६ मतदार आहेत. त्या पैकी एकट्या भाजपकडे साडेचारशेच्या आसपास मतदार आहेत. या शिवाय महायुती मधील शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी ( अजित पवार) पक्षाची अशी मिळून संख्या मोठी होती. तर विरोधकांकडे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध करावी.व्यवस्थेवरही ताण येऊ नये म्हणून विरोधकांनी निवडणूक न लढवता. ही निवडणूक बिनविरोध करावी आणि सोलापुरात इतिहास घडवावा, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी केले आहे.
——————–
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी देणार हे पक्षश्रेष्टी निर्णय घेतील. कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याला तिकीट मिळावे हे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो प्रमाण मानू असे ते म्हणाले.
——————-
दरम्यान, काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर होणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरचे काम सुरू होण्यापूर्वीची यंदाची शेवटची आषाढी वारी असणार आहे. वारीच्या अनुषंगाने अनेक स्तरावर तयारी सुरू आहे. मात्र पुढच्या वर्षी कॉरिडॉरचा वेगळ्या माहोलात पंढरपूरची वारी होईल. कॉरिडॉरच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे निर्णय हे मुख्यमंत्री घेणार आहेत. मात्र टेंडर प्रक्रिया होऊन आषाढीनंतर बाधितांना योग्य मोबदला देऊन भूसंपादन होईल. अशी माहिती गोरे यांनी दिली आहे.
——————–
चौकट : ( आषाढी यात्रेचे नियोजन सुरु )
आषाढी वारी संदर्भात नियोजन सुरू आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा वारीला येणाऱ्या भाविकांना नवे तंत्रज्ञान वापरून चांगल्या सोयीसुविधा देणार आहे असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.






















