सोलापूर : अधिकमासाचे औचित्य साधून श्री जगदंबा सांस्कृतिक व बहुद्देशीय संस्था मर्या. सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला प्रथम वर्षाचा “ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, भजन व कीर्तन सोहळा” नुकताच अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. श्री जगदंबा देवी मंदिर सभागृह, जगदंबा नगर, आकाशवाणी केंद्र येथे पार पडलेल्या या आठ दिवसीय आध्यात्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
या महोत्सवांतर्गत १८ मे ते २४ मे दरम्यान दररोज सकाळी ७:०० ते १०:३० या वेळेत सामुदायिक ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला. तसेच दररोज रात्री ८:०० ते १०:०० या वेळेत विविध नामांकित भजनी मंडळांचे ‘भजन संध्या’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये साधना महिला भजनी मंडळ (महादेव चौक), कृष्णाप्पा महाराज भजन मंडळ (भारतीय चौक), गोरोबा काका महिला भजनी मंडळ (लष्कर), राधा कृष्ण भजनी मंडळ (हिप्परगा), हरिपाठ परिवार (स्वागत नगर – भव्य देखावा पाहुल) आणि शिवानंद कुटि हरिपाठ भजन मंडळ यांनी आपली सेवा सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
सोहळ्याच्या अंतिम दिवशी, २४ मे रोजी सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत कीर्तन श्रोत्रिय ब्रम्हानिष्ठ ह.भ.प. गुरुवर्य लक्ष्मण महाराज चव्हाण (सोलापूर) यांच्या सुश्राव्य वाणीतून ‘भव्य सांगता कीर्तन’ पार पडले. त्यांच्या सुश्राव्य आणि विचारप्रवर्तक कीर्तनाने संपूर्ण सभागृह विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेले होते.
हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री जगदंबा सांस्कृतिक व बहुद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकभक्तांनी विशेष परिश्रम घेतले. सोहळ्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.