सांगोला – भारत सरकारच्या वतीने संपूर्ण देशामध्ये जनगणना २०२७ या राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ दि.१६ मे पासून झाला असून या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात दि.१६ मे पासून घर यादी व घर गणना करण्यात येत आहे. सोमवार दि.२५ मे रोजी या राष्ट्रीय कार्यात सांगोला शहरात कर्तव्य बजावत असताना सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे सहशिक्षक राजेंद्र दामोदर ढोले (वय-४९) यांचे चक्कर येऊन पडल्याने दुःखद निधन झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे सहशिक्षक राजेंद्र ढोले हे सांगोला शहरातील पाटील/चौगुले वस्ती येथे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जनगणना २०२७ या मोहिमेच्या अंतर्गत घर यादी व घर गणनेचे काम करत असताना अचानक त्यांना असह्य उलट्या होऊन ते चक्कर येऊन पडले. त्यांना अमोल कोरे यांनी उपचारास ग्रामीण रुग्णालय, सांगोला येथे दाखल केले असता ते उपचारापुर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले. याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.शंभुराजे साळुंखे यांनी सांगोला पोलीस ठाणे येथे खबर दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
चौकट-
राजेंद्र ढोले हे आपल्या मनमिळावू स्वभावामुळे संपूर्ण सांगोला तालुक्यात अत्यंत लोकप्रिय होते. शिक्षण क्षेत्रातील कार्यासोबतच ते सामाजिक कार्यात नेहमीच हिरीरीने सहभाग घेत असत. त्यांच्या या अकाली आणि धक्कादायक निधनाने शिक्षण क्षेत्रात, विद्यामंदिर परिवारात आणि त्यांच्या मित्रपरिवारात अत्यंत तीव्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे.