
सोलापूर – निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीने मास्टर्स क्रिकेट अकॅडमीच्या १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पुष्प अकॅडमीच्या मैदानावर हा रोमांचक अंतिम सामना मॉडेल क्रिकेट अकॅडमी विरुद्ध निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमी यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना ४८.४ षटकांत सर्वबाद २४४ धावांचा डोंगर उभारला. यामध्ये यश पवार याने ५९ धावांची आणि संदेश गाडे याने ४० धावांची उत्कृष्ट खेळी केली. मॉडेल क्रिकेट अकॅडमीकडून गोलंदाजी करताना फरहान सय्यदने १० षटकांत ४९ धावा देऊन ३ बळी घेतले, तर संस्कार गवळीने १० षटकांत ५० धावा देत ३ बळी मिळवले.
विजयासाठी २४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मॉडेल क्रिकेट अकॅडमीचा संघ ५० षटकांत ८ बाद २१० धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून दर्शन हिरकुर याने ५४ धावा आणि साई घुगे याने ३८ धावा केल्या. निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीकडून धारदार गोलंदाजी करताना यश पवार याने १० षटकांत ५५ धावा देत ३ बळी घेतले. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीने हा सामना ३४ धावांनी जिंकून चषकावर आपले नाव कोरले.
पारितोषिक वितरण ‘जेएमडी डेव्हलपर्स’चे मालक जगदीप भीमरथी, दत्तात्रय बडगू, चंद्रशेखर उदगिरी, राजेश येमुल, वर्धन दळवी आणि निलेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
सामन्याचे पंच म्हणून नबीलाल पटेल व आर्सनल शेख यांनी काम पाहिले, तर गुणलेखक म्हणून वर्धन दळवी यांनी जबाबदारी सांभाळली.
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कार:
- सामनावीर: यश पवार
- उत्कृष्ट फलंदाज: अभिषेक देशमुख
- उत्कृष्ट गोलंदाज: झैद शेख
- मालिकावीर (मॅन ऑफ द सीरिज): ऋग्वेद पाटील

















