सोलापूर : पावसाळ्याच्या तोंडावर शहरात पाणी तुंबण्याच्या समस्या टाळण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने नाले खोलीकरण, रुंदीकरण व अडथळे हटविण्यात यावेत. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा, असे आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी प्रशासनाला दिले.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध प्रमुख नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त सोनाली यादव, नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
जुना पूना नाका, बाळे परिसरातील वैष्णवी हाइट्स, उमानगरीमधील शरदचंद्र पवार शाळेजवळील नाला, स्पर्श हॉस्पिटल परिसर, गुलमोहर अपार्टमेंट, ६ कमान, १४ कमान, यश नगर आणि ५४ मीटर रस्ता परिसरातील नाल्यांची सखोल पाहणी करण्यात आली.पाहणीदरम्यान नाल्यांमधील गाळ, पाण्याचा प्रवाह, अतिक्रमणे, निचऱ्यातील अडथळे आणि स्वच्छतेची स्थिती याचा आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच नाल्यात मिसळणाऱ्या सांडपाण्याच्या स्रोतांबाबत चौकशी करून आवश्यक कारवाईचे आदेश देण्यात आले.काही भागांत नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणारे छोटे पूल आणि अन्य संरचना निदर्शनास आल्यानंतर ते तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
नागरिकांना त्रास होऊ देणार
नाही : महापौर कोंड्याल
यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, शहरात पाणी साचू नये आणि निचरा सुरळीत राहावा यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. ज्या ठिकाणी समस्या आढळतील, त्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Post Views: 14