
सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छता, देखभाल आणि शासकीय कार्यालयांच्या कामकाजाबाबत अचानकपणे झालेल्या पाहणी मोहिमेचे पडसाद आता थेट आरोग्य विभागात उमटू लागले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी मुख्यालयातील विविध विभागांची झाडाझडती घेतल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा अक्षरशः अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी संध्याकाळी थेट मार्डीसह होटगी, तिऱ्हे आणि कंदलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी करत कोपूरवाड यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या धडक मोहिमेनंतर जिल्हा परिषद मुख्यालयातील विविध विभागीय कार्यालय आता अलर्ट मोडवर आले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या अचानकपणे होणाऱ्या भेटीचे पडसाद आता विविध विभागात उमटू लागलेले आहेत. या पाहणीदरम्यान आरोग्य, प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण विभाग रडारावर राहिले. विभागांच्या झाडाझडीनंतर उपाध्यक्ष अध्यक्षांनी संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांना स्वच्छता, देखभाल दुरुस्ती आणि अडगळीवरून खडेबोल सुनावले. त्याचा परिणाम म्हणून आरोग्य विभागात आता खऱ्या अर्थाने स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या पाहणीनंतर आरोग्य विभागाचे प्रमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश कोपूरवाड यांनी संध्याकाळी थेट मार्डी गाठली.
अन् उपाध्यक्षांच्या सूचनेनुसार मार्डी आरोग्य केंद्राची पाहणी करत तेथील अधिकाऱ्यांना स्वच्छता देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्यास स्वतःच्या खिशातून आरोग्य केंद्र स्वच्छ आणि सुशोभित ठेवण्याचे निर्देश दिले. त्याच पद्धतीने होटगी आरोग्य केंद्रामध्ये देखील त्यांनी पाहणी करत तेथील संबंधित आरोग्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना पदरमोड करून स्वच्छता आणि देखभाल दुरुस्ती येत्या आठ दिवसात पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या. दरम्यान, या सूचनांचे पालन न झाल्यास संबंधित आरोग्य केंद्रांच्या अधिकाऱ्यांची तसेच कर्मचाऱ्यांची वेतन वाढ रोखण्यासाठी प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगितले. डी.एच.ओ यांच्या या कडक आणि शिस्तीच्या भूमिकेमुळे आरोग्य विभागात खळबळ माजली असून सुस्तावलेल्या आरोग्य विभागाची भंबेरी उडालेली दिसत आहे.
यावेळी समन्वयक तथा मुंबईचे सहायक संचालक कु.कल्याण अमितकुमार पाटील यांनी प्रा आ केंद्र कंदलगाव येथे भेट दिली. प्रा आ केंद्राची तपासणी करून मार्गदर्शन केले व समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य डॉ. पृथ्वीराज माने, यांनी प्रा आ केंद्र तिऱ्हे उ. सोलापूर अंतर्गत डोणगाव व पाथरी उपकेंद्र जागेची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, डॉ. विनोद अभिवंत जिल्हा क्षयरोग वैद्यकीय अधिकारी हेमंत पवार, जिल्हा सांख्यिकी अधिकारी व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोट
अन्यथा वेतनवाढीला कात्री
संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची पाहणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता देखभाल दुरुस्ती आणि अडगळीच्या साहित्यांची पाहणी करून संबंधित केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी स्वच्छता आणि देखभाल दुरुस्ती होत नाही. त्या ठिकाणी कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल.
– डॉ.सतीश कोपूरवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी
Post Views: 23