सोलापूर — दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील कृषी सहायक अमोल देवकर यांनी शेतकऱ्यांशी उद्धट वर्तन करून त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषी सहायक देवकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कासेगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तालुका पोलीस व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिला होता . या निवेदनाची दखल घेऊन तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी वरिष्ठ कार्यालयात देवकर यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार पुणे विभागीय कृषी सहसंचालक दतात्रय गावसाने यांनी देवकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
कृषी सहायकाच्या वर्तनाचा निषेध म्हणून शुक्रवारी २९ मे रोजी कासेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘खरीप हंगाम विस्तार मोहीम’ कार्यक्रमावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता . त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन देवकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत निलंबन केला आहे. तसेच निलंबन काळात उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कासेगाव येथील शेतकऱ्यांनी देवकर हे गावात येत नाहीत, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नाहीत आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत, अशी तक्रार केली होती. या तक्रारीबाबत विचारणा केली असता देवकर यांनी संबंधित शेतकऱ्यांना अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या घटनेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली होती.
सरपंच यशपाल वाडकर यांनी कृषी सहाय्यक अमोल देवकर यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी केल्या होत्या. शिवाय कासेगाव ग्रामस्थांनी कारवाई मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे कासेगावच्या कृषी सहायकावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
….
चौकट
….
मंद्रूपच्या मंडल कृषी अधिकार्यांवर कारवाई कधी ?
…
मंद्रूपचे मंडल कृषी अधिकारी किरण सावंत मंद्रूपच्या कार्यालयाला दांडी मारून शासनाची फसवणूक करीत आहेत. विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकरी आल्यानंतर मंडल कृषी अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून येते. त्यामुळे शासकीय योजना कागदावरच राहीले आहेत. कार्यालयाला दांडी मारून शेतकर्यांना लाभापासून वंचित ठेवणार्या मंडल कृषी अधिकार्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Post Views: 5