सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये सामासिक अंतर (मार्जिन), पार्किंग जागा तसेच नियमानुसार खुल्या ठेवावयाच्या जागांमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर आज कारवाई करण्यात आली. या मोहिमेत चार ठिकाणांवरील वाढीव व अनधिकृत बांधकामांचे पाडकाम पूर्ण करण्यात आले.
भवानी पेठ येथील टी.पी. क्र. ०२, अंतिम प्लॉट क्र. ९० एच/३२ या ठिकाणी मिळकतदार रामकृष्ण मल्लिकार्जुन रंगदाळ व इतर यांच्या मालकीच्या इमारतीच्या रिअर मार्जिनमध्ये बांधण्यात आलेला जिना तसेच संडास-बाथरूमचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. या कारवाईसाठी संबंधित मिळकतदारांनी स्वतः ब्रेकर व मजूर उपलब्ध करून देत सहकार्य केले.याशिवाय बालाजी नगर येथील श्रीकांत चोपडा आणि सलगरवाडी येथील सय्यद मदनी यांच्या अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यात आली. नेहरू नगर येथील पलवेचा तसेच विजय देशमुख नगर येथील पिरजादे यांच्या जागेवरील सामासिक अंतरातील वाढीव बांधकामे व बाल्कनीचे पाडकाम करण्यात आले. तसेच बोलकोटे नगर येथील अशोक तांबोळू यांच्या वाढीव बांधकामाचेही निष्कासन करण्यात आले.
ही कारवाई आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली तर कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांच्या नियंत्रणा खाली पार पडली. यावेळी उप अभियंता आनंद जोशी, सहायक अभियंता इरशाद जरतार, कनिष्ठ अभियंते बसवराज बडगा, गणेश काकडे, अनिरुद्ध गदगे, दयानंद अवताडे, प्रमोद गोविंदवार, तौसीफ सय्यद, अतिक्रमण विभागाचे दीपक कुंभार तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत बांधकामे, सामासिक अंतरातील अतिक्रमणे आणि पार्किंग जागेतील बेकायदेशीर बांधकामांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे मठपती यांनी स्पष्ट केले आहे.
Post Views: 8