सोलापूर : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जनगणना २०२७च्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा अध्यादेश काढला आहे. यामुळे त्यानुसार सोलापूर महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया होणार आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी “महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५” मध्ये सुधारणा करणाऱ्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. सध्याच्या कायद्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या एप्रिल किंवा मे महिन्यात करण्याची तरतूद आहे. मात्र, देशभरात होणाऱ्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याचे काम महाराष्ट्रात सुरू होणार असल्याने ही मुदत वाढविण्यात आली आहे.
शासनाच्या निवेदनानुसार, राज्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची यादी व गृहगणनेचे काम १६ जून ते १४ जुलै २०२६ या कालावधीत होणार आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय यंत्रणा गुंतणार असल्याने बदल्यांची प्रक्रिया जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार, आता सन २०२६ मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या ३० जून २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी करता येणार आहेत. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसल्याने तातडीची गरज लक्षात घेऊन हा अध्यादेश जारी करण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांनी अध्यादेश जारी केला असून, शासनाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी राजपत्र आदेश प्रसिद्ध केला आहे.
Post Views: 7