सोलापूर – शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रियेला सोलापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ३,०९६ पात्र विद्यार्थ्यांपैकी २,४०६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनाही संधी मिळत असून, त्यातील २९३ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जिल्ह्यातील २८६ आरटीई शाळांमधील २,९४७ जागांसाठी एकूण ६,७०२ पालकांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. लॉटरी प्रक्रियेद्वारे ३,०९६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्ण होत असताना बहुतांश जागांवर प्रवेश निश्चित झाल्याचे चित्र आहे.
शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कागदपत्र पडताळणीला प्राधान्य दिले आहे. अर्ज करताना ऑनलाइन सादर केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि साक्षांकित छायाप्रती पालकांनी सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रतही सादर करावी लागणार आहे.
दरम्यान, उर्वरित पात्र विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू असून, रिक्त राहिलेल्या जागांवर पुढील टप्प्यात प्रवेश दिले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
चौकट
यंदा प्रवेशप्रक्रिया वेळेत सुरू झाल्यामुळे शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच आरटीईच्या बहुतांश जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
चौकट
जिल्ह्यातील आरटीई प्रवेशाची सद्यस्थिती
एकूण अर्ज : ६,७०२
उपलब्ध जागा : २,९४७
निवड झालेले विद्यार्थी : ३,०९६
प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी : २,४०६
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी : ४२३
प्रतीक्षा यादीतून प्रवेश घेतलेले : २९३
आरटीई शाळांची संख्या : २८६
Post Views: 10