अकलूज – महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात कार्यरत असलेले कक्षसेवक सुभाष दामू साठे हे वयोमानानुसार दिनांक 31 मे 2026 रोजी प्रदीर्घ 40 वर्षांची यशस्वी व निष्ठावंत सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. यानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. साठे यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, समयसूचकता आणि सेवाभावी वृत्ती यांचा आदर्श ठेवत शासकीय विश्रामगृहातील जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. विविध शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या सेवेसाठी त्यांनी सदैव तत्पर राहून आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या शांत, संयमी आणि सहकार्यशील स्वभावामुळे सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये त्यांना विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी श्री. साठे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या दीर्घ सेवेला सलाम केला. अनेकांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्यपद्धती, शिस्तप्रियता आणि कर्मनिष्ठेच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या सेवेमुळे विभागाची प्रतिमा उंचावण्यास मोठे योगदान मिळाल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमात श्री. साठे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. साठे यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणी सांगत अधिकारी व सहकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्री. सुभाष दामू साठे यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत, त्यांचे उर्वरित जीवन आनंद, सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि कौटुंबिक समृद्धीने भरून जावो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त केली.
“कर्तव्यनिष्ठेचा प्रवास संपला, पण त्यांच्या कार्याची प्रेरणा कायम स्मरणात राहील,” अशा भावनिक शब्दांत सहकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला.
Post Views: 10