
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने आंतरविद्यापीठ संघ प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजनाबाबत मंगळवार, २ जून रोजी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अतुल लकडे यांनी दिली.
ही बैठक विद्यापीठाच्या ‘राजमाता जिजाऊ माँसाहेब व्यवस्थापन परिषद कक्ष’ येथे सकाळी ११:३० वाजता पार पडणार आहे.
प्रतिवर्षी सोलापूर विद्यापीठाचे विविध खेळांचे संघ अखिल भारतीय विद्यापीठ संघ, नवी दिल्ली (AIU) यांच्यामार्फत आयोजित वेस्ट झोन, साऊथ वेस्ट झोन, ऑल इंडिया आणि खेलो इंडिया अशा विविध आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ संघांसोबत उत्कृष्ट संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक पाठविण्यासंदर्भात क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच विद्यापीठाच्या संघात असणाऱ्या खेळाडूंना विशेष कौशल्य आत्मसात करता यावे आणि त्यांच्या खेळाचा दर्जा उंचावावा या उद्देशाने विशेष प्रशिक्षण शिबिरे (Special Training Camps) राबविण्यात येणार आहेत. या महत्त्वपूर्ण उपक्रमात तज्ज्ञांचे सहकार्य व नियोजन निश्चित करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले
या विशेष उपक्रमासाठी आणि बैठकीसाठी सोलापुरातील विविध क्रीडा क्षेत्रातील २२ प्रमुख मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने या मान्यवरांचा समावेश आहे
या तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांना निमंत्रण
भारती लिंगडे, सुर्याजी लिंगडे, दिपक चिकने, सचिन ढवण, श्री. हावळे, उदय वगरे, अक्षय माने, जरार कुरेशी, धनाजी खरात, मिहीर जाधव, सुवर्णा कांबळे, सत्येन जाधव, सदानंद गाजुले, सागर शिरसीकर, अस्मिता घोलप, अविनाश गोसावी, श्रीकांत शेटे, झेड.एम.पुणेकर, अनिल गिराम, निलेश वरवडकर, तृप्ती अवताडे, भैरवनाथ आर्किले.
——-
सोलापूर विद्यापीठाचा स्तुत्य उपक्रम
विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे आगामी काळातील आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये सोलापूर विद्यापीठाच्या खेळाडूंची कामगिरी अधिक उंचावण्यास मदत होणार असून, सोलापूर विद्यापीठाने प्रथमच शारीरिक शिक्षण संचालकाव्यतिरिक्त सोलापुरातील तज्ञ प्रशिक्षकांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या या निर्णयाचे स्वागत आहे.
– सत्येन जाधव, खो-खो व कबड्डी एनआयएस प्रशिक्षक.
























