
सोलापूर : देशातील सर्वाधिक आव्हानात्मक, स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी जेईई अँडव्हान्स्ड २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, वालचंद आर्ट्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाचे कु. अनिकेत खडके आणि रेवणेश सुतार यांनी उल्लेखनीय यश संपादन करत भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) प्रवेश मिळविण्याचा मानाचा मार्ग प्रशस्त केला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे केवळ महाविद्यालयाचाच नव्हे, तर संपूर्ण सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव उंचावला असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरही यशाचे शिखर गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
१७ मे रोजी झालेल्या या परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे अनिकेत आणि रेवणेश हे सोलापूरच्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचे दीपस्तंभ ठरले आहेत. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून अत्यल्प विद्यार्थ्यांना यश लाभणाऱ्या या स्पर्धात्मक परीक्षेत त्यांनी मिळवलेले यश त्यांच्या अथक परिश्रम, स्वयंशिस्त, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांच्या दर्जेदार मार्गदर्शनाचे फलित आहे.
या यशाने वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उत्कृष्ट शैक्षणिक परंपरेची, गुणवत्तापूर्ण अध्यापनाची आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक दृष्टिकोनाची पुन्हा एकदा प्रभावी साक्ष दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या वालचंद शिक्षण समूहाने स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी निर्माण केलेले सक्षम शैक्षणिक वातावरण आज यशस्वी परिणामांच्या रूपाने दिसून येत आहे.
याप्रसंगी वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त इंजी. वैभव गांधी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “सोलापूरकर विद्यार्थ्यांमध्ये मेहनत, चिकाटी आणि ध्येयपूर्तीसाठी झटण्याची वृत्ती नैसर्गिकरित्या आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता आणि क्षमता दडलेली आहे. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून दिल्यास हे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरही आपली छाप उमटवू शकतात. हीच भूमिका लक्षात घेऊन वालचंद शिक्षण समूह विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.”
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, भूषण शहा, पराग शहा यांच्यासह समस्त विश्वस्त, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, समन्वयिका प्रा. सारिका महिंद्रकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. अनिकेत आणि रेवणेश यांचे हे यश केवळ वैयक्तिक यश नसून सोलापूरच्या शैक्षणिक क्षमतेचे आणि वालचंदच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण परंपरेचे दिमाखदार प्रतीक ठरले आहे.






















