
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पाथरी येथे आयोजित करण्यात आलेले निकाली कुस्त्यांचे भव्य मैदान उत्साहात संपन्न झाले. जिल्ह्यासह पुणे, कोल्हापूर, लातूर आणि कर्नाटक राज्यातील नामांकित मल्लांच्या उपस्थितीमुळे मैदानाला विशेष रंगत आली होती. हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत पैलवान रोहन केवडे याने दमदार कामगिरी करत प्रतिष्ठेची ‘अहिल्या केसरी’ चांदीची गदा पटकावली.
या कुस्ती मैदानात १०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंतच्या अनेक चुरशीच्या कुस्त्या रंगल्या. मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेली अंतिम लढत पैलवान रोहन केवडे आणि पैलवान शुभम मगर यांच्यात झाली. तब्बल एक तास रंगलेल्या या अटीतटीच्या कुस्तीत रोहन केवडे याने गुणांच्या आधारे विजय मिळवत मैदान गाजवले.
विजयी पैलवान रोहन केवडे यांचा ७५ हजार रुपये रोख रक्कम आणि चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. या विजयानंतर रोहन केवडे याला ‘अहिल्या केसरी’ किताबाचा मान मिळाला.
या कुस्ती मैदानास राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान रणजित नलवडे, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान भरत मेकाले, सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे, नॅशनल चॅम्पियन पैलवान सुरेश ऐवळे, पैलवान सिद्धू माने, पैलवान तुकाराम कांबळे, पैलवान प्रकाश घोडके, गणेश नरूटे आणि रामभाऊ दुधाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्पर्धेचे पंच म्हणून डबल महाराष्ट्र चॅम्पियन श्रीकांत बंडगर, वस्ताद चंद्रकांत मारकड, दिनकर बंडगर, अमोल बंडगर, हरी बंडगर, सचिन आबा बंडगर, प्रेम बंडगर, उद्धव बंडगर, म्हाळाप्पा बंडगर, सरपंच संजय वाघमोडे, विष्णू बंडगर, नागनाथ मळगे आणि रवी जाधव यांनी काम पाहिले.



















