पंढरपूर – येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जतन व संवर्धनाची कामे सुरू आहेत. या कामां दरम्यान अनेक ऐतिहासिक वस्तू समोर येत आहेत. अलीकडेच सुमारे ४०० वर्षे जुना दगडी रांजण सापडला होता. त्यानंतर आता सुमारे २६८ वर्षे जुनी आणि तब्बल दोन टन वजनाची पंचधातू पासून बनविलेली ऐतिहासिक घंटा अडगळीत पडल्याचे समोर आले आहे. ही महाकाय घंटा मंदिरात पुन्हा प्रतिष्ठापना करावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी इ.स.१७३९ मध्ये वसई मोहिमेत पोर्तुगीजांवर मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ ही घंटा विठ्ठल मंदिराला अर्पण केल्याची आख्यायिका सांगितली जाते.
वसई किल्ला जिंकल्यानंतर तेथील चर्चमधील मोठ्या घंटा महाराष्ट्रातील विविध मंदिरांना भेट म्हणून देण्यात आल्या. त्यापैकीच ही एक घंटा असल्याचे मानले जाते. युरोपियन बनावटीची ही घंटा पंचधातू पासून तयार करण्यात आली असून, तिचा नाद गंभीर आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगितले जाते.
अशा प्रकारच्या घंटा वाई, भीमाशंकर (पुणे) , मेणेश्वर (वाई), बनेश्वर(पुणे), नारोशंकर ( नाशिक), भापकर (बारामती), दुर्गादेवी (मुरुड) येथील मंदिरांमध्ये आजही पाहायला मिळतात.
सध्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन-संवर्धनाच्या कामांमुळे ही घंटा बाजूला ठेवण्यातआली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पेशवेकालीन विठ्ठल सभामंडपात तिची पुनर्स्थापना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
———
कोट
पेशवेकालीन सुमारे २६८ वर्षे जुनी, दोन टन वजनाची पंचधातूची घंटा मंदिरात आहे. जतन-संवर्धनाच्या कामामुळे ती तात्पुरती काढून ठेवण्यात आली होती. काम पूर्ण झाल्यानंतर ही घंटा योग्य ठिकाणी बसवली जाईल.
प्रवीणकुमार घम (व्यवस्थापक, विठ्ठल मंदिरसमिती, पंढरपूर )
Post Views: 14