परंडा – अन्न व औषध प्रशासनाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच परंडा शहरातील गुटखा माफियांवर मोठा दणका दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने शहरातील चार ठिकाणी धाड टाकून तब्बल १ कोटी २ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला असून या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्त तुकाराम मुंढे व सहाय्यक आयुक्त श्रीकांत कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जून रोजी पहाटे ही विशेष मोहीम राबविण्यात आली. धाराशिव, लातूर आणि सोलापूर येथील विशेष पथकांनी संयुक्तरीत्या कारवाई करत परंडा शहरातील विविध ठिकाणांवर अचानक छापे टाकले.
बावची चौक परिसरातील तीन वेगवेगळ्या गोदामांमध्ये समाधान खुळे व प्रमोद खुळे यांनी मोठ्या प्रमाणात तंबाखूमिश्रित गुटखा साठवून ठेवल्याचे आढळून आले. तसेच बसस्थानक रोडवरील निजामपुरा भागातील एका बेकरीजवळूनही मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाईत ७८ लाख ७५ हजार ५५५ रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी रोहित दिनेश फंदे (वय २६) यांच्या प्रथम खबरीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय दंड संहितेतील विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
या धाडसत्रात सहाय्यक आयुक्त प्रमोदकुमार काकडे, संतोष सावंत, डॉ. सुमित खांडेकर, वीरस्वामी, उमेश भुसे, धनंजय आगाव, रोहित फंदे, गणेश दत्तू, अभिजित झोंडगे, ऋषिकेश मते यांच्यासह परंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
चौकट
जप्ती इतकी मोठी की दोनदा टेम्पो बोलवावा लागला!
धाडीत जप्त करण्यात आलेला गुटखा एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की पंचनामा पूर्ण झाल्यानंतर तो पोलीस ठाण्यात हलविण्यासाठी मोठा टेम्पो दोन वेळा बोलवावा लागला. दरम्यान, कारवाईची माहिती शहरभर पसरताच परंड्यातील एकही पानटपरी दिवसभर उघडी दिसली नाही. या धाडसत्रामुळे गुटखा विक्रेते व साठेबाजांचे धाबे चांगलेच दणाणले असून शहरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.























