वैराग : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. शेअर बाजारात झालेल्या तब्बल १ कोटी ८१ लाख रुपयांच्या नुकसानीच्या प्रचंड नैराश्यातून एका मुख्याध्यापकाने आपल्या पत्नीसह दोन निष्पाप मुलांना विष पाजून स्वतः गळफास घेत जीवनयात्रा संपवली आहे. या भीषण घटनेमुळे हत्तीज गावासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
योगेश बाळासाहेब पाटील (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या कुटुंबप्रमुखाचे नाव असून, त्यांच्या पत्नी माधुरी योगेश पाटील (वय ३३), मोठा मुलगा अथर्व (वय ११) आणि लहान मुलगा शिवांश (वय ७) अशी मृत पावलेल्या अन्य सदस्यांची नावे आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आले होते गावी…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हे मूळचे हत्तीजचे रहिवासी असून ते नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. पत्नी आणि दोन मुलांसह ते तिथेच वास्तव्याला असायचे. नुकतेच ते उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त कुटुंबासह गावी आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते अत्यंत शांत आणि तणावात असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना जाणवत होते. त्यांनी नातेवाईकांपाशी आपण ‘खूप लॉसमध्ये’ असल्याचे जुजबी बोलून दाखवले होते.
अशी उघडकीस आली घटना:
दिनांक १२ जून रोजी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास योगेश यांच्या घराचा दरवाजा उघडला नसल्याने त्यांच्या चुलती आणि इतर नातेवाईकांनी तिथे जाऊन पाहिले. आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने शेवटी नातेवाईकांनी लोखंडी गजाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत प्रवेश करताच उपस्थितांच्या पायाखालची जमीनच सरकली. घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगला योगेश यांनी गळफास घेतलेला अवस्थेत आढळले, तर पत्नी माधुरी आणि दोन्ही मुले बेडवर आणि खाली गादीवर मृतावस्थेत पडलेली होती. त्यांच्या तोंडातून पांढरा फेस आलेला होता.
‘कोराजन’ विषाचा वापर आणि सुसाईड नोट:
घराची आणि स्वयंपाकघराची पाहणी केली असता तिथे ‘Coragen’ (कोराजन) नावाच्या विषारी कीटकनाशकाची ६० मिलीची बाटली उघडलेल्या स्थितीत आढळली. जवळच एका प्लास्टिकच्या कपमध्ये गुलाबी रंगाचे औषध आणि चमचा आढळून आला. रात्रीच्या वेळी जेवणातून किंवा अन्य खाद्यपदार्थातून हे विष पत्नी आणि मुलांना पाजण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याच खोलीत एका लॅपटॉपच्या कीबोर्डवर ठेवलेल्या वहीत तब्बल २४ पानांवर निळ्या रंगाच्या शाईने लिहिलेली सविस्तर सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये योगेश यांनी शेअर बाजारात ऑनलाइन पैसे लावत असताना १ कोटी ८१ लाख रुपयांचे (१,८१,००,०००/-) प्रचंड नुकसान झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या कर्जाच्या आणि पैशांच्या टेन्शनमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.
हृदय पिळवटून टाकणारे सुसाईड नोटमधील वाक्य:
योगेश यांनी आपल्या कुटुंबाला का संपवले, याचे कारण देताना सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की,
“जग मला वाईट म्हणेल पण मी बायको मुलांना एकटं सोडून जावु शकत नव्हतो. त्यांचा सांभाळ कोण करणार, आयुष्यभर दुःख सोसत बसु देवु शकत नाही म्हणून… I love to madhuri and shivansh, atharv” पुढील तपास सुरू:
या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील यांनी वैराग पोलिसांना कळवले. वैराग पोलीस ठाण्याचे पथक तसेच फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सुसाईड नोट, लॅपटॉप, दोन मोबाईल, विषाची बाटली आदी साहित्य जप्त केले आहे. चारही मृतदेह बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, योगेश यांचे चुलत भाऊ महेश पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. शेअर बाजाराच्या मोहापायी एका सुशिक्षित आणि हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.