पुणे – आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत योगाचा व्यापक प्रसार व जनजागृती करण्यासाठी एका विशेष ऑनलाईन योग सत्राचे आयोजन करण्यात आले असून, याद्वारे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित करण्याचा मानस आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी या ऐतिहासिक उपक्रमात राज्यातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि विविध संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
हे ऑनलाईन योग सत्र रविवारी, १४ जून २०२६ रोजी सकाळी ६:१५ ते ७:१५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि ‘हॅबिल्ड हेल्थटेक प्रा. लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे सत्र होणार असून, याचे थेट प्रक्षेपण आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर केले जाईल.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी १८००-३१५-४००८ या टोल फ्री क्रमांकावर मिसड कॉल देऊन आपली पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला मोबाईलवर सत्राची लिंक व आवश्यक सूचना पाठवल्या जातील. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निकषांनुसार, प्रत्येक सहभागीने स्वतःच्या स्वतंत्र मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबलेटवरून सत्रात लॉग-इन करणे बंधनकारक आहे. प्रत्येक स्वतंत्र उपकरणाची नोंदणीच यात ग्राह्य धरली जाणार आहे.
या उपक्रमात जास्तीत जास्त लोकसहभाग सुनिश्चित करण्यासाठी सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्रे आणि स्वयंसेवी संस्थांना सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आरोग्यदायी उपक्रमात आणि जागतिक विक्रमात आपले योगदान द्यावे, असे सहसंचालक श्री. मोरे यांनी केले आहे.
——


















