
सांगोला – तालुक्यातील बुद्धेहाळ तलावातून चोपडी, सोमेवाडी, बुद्धेहाळ या गावातील व परिसरातील शेतकरी शेतीसाठी उचल पाणी घेऊन शेती करीत आहेत. शुक्रवार दि.१२ जून रोजी रा.११ ते पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान बुद्धेहाळ तलावातून उचल पाणी घेणाऱ्या २५ ते ३० शेतकऱ्यांच्या सुमारे २ हजार ५०० मीटर लांबीच्या मोटारींच्या केबल तोडून चोरी करून त्या तलाव परिसरात जाळून त्यातील तांब्याची वायर काढून घेतली आहे. चोरट्यांनी धाडसी चोरी करीत शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटात टाकले आहे. या सर्व केबलची किंमत सुमारे ६ लाख रुपये इतकी आहे. तलाव परिसरात रात्रीच्या वेळी कोणी फिरकत नसल्याने याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी ही चोरी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सांगोला व कोळा पोलीस स्टेशनला माहिती दिली असून पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. सध्या तांब्याच्या केबलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने चोरट्यांनी केबल चोरून त्यातील तांब्याची वायर काढून सुमारे ६ लाख रुपये किमतीच्या केबलची चोरी केल्याने तलावातील उचल पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने या केबल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा कसोशीने शोध घेऊन न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.