सांगोला – शहरात अधिक मासानिमित्त विठ्ठल नामाच्या गजरात भक्तीभावाने निघणाऱ्या तीन दिंड्यांना मुस्लिम बांधवांकडून अल्पोपहार व चहा वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकी आणि हिंदू-मुस्लिम धार्मिक सलोख्याचे एक अनोखे आणि आदर्श उदाहरण संपूर्ण सांगोला शहराला पाहायला मिळाले.
अधिक मासाचे औचित्य साधून शहरात तीन ठिकाणाहून दररोज दिंड्या निघत असतात. सांगोल्यातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत या दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या वारकरी भाविकांसाठी चहा आणि अल्पोपहाराचे वाटप शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केले. मुस्लिम बांधवांच्या या अनोख्या उपक्रमाचे आणि आपुलकीचे वारकऱ्यांनी मनापासून कौतुक केले व धन्यवाद मानले. याप्रसंगी शाही जामा मस्जिदचे इमाम हाफिज शाहिद रजा, हाजी युसुफ मुलाणी, सलिम मुलाणी, मेहबुब पठाण, निहाल मुलाणी, हाजी हसन पठाण, मेजर सलिम शेख, इम्रान मुल्ला, राजू मुलाणी उपस्थित होते. सांगोला शहराला नेहमीच सर्वधर्मीय एकतेची आणि सलोख्याची मोठी परंपरा लाभली आहे. या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सर्वच स्तरातून मुस्लिम बांधवांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.