सोलापूर – राज्यातील महाविद्यालयांमध्ये सुरू असलेली प्राध्यापक भरती संस्था स्तरावर न करता, ती विद्यापीठीय अथवा राज्यस्तरावर केंद्रीय पद्धतीने करण्यात यावी, अशी आग्रही मागणी मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष प्रा. डॉ. सिद्धराम सलवदे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांना एक निवेदन सादर केले.
यावेळी शिष्टमंडळामध्ये संघटनेचे अध्यक्ष डॉ. सिद्धराम सलवदे, सचिव डॉ. मनोज कसबे, सहसचिव प्रा. परमेश्वर हटककर तसेच प्राचार्य डॉ. दिगंबर झोंबाडे, डॉ. रेखा ओहोळ, डॉ. अरुण सोनकांबळे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. अभिमन्यू ओहोळ, डॉ. पंडित बन्ने, डॉ. बालाजी गंगावणे, डॉ. परमेश्वर हाटकर, डॉ. बापू राऊत, डॉ. दीपक देडे, डॉ. वैभव गायकवाड, डॉ. नागेश गायकवाड, प्रा. राजेश काळे, प्रा. आर. पी. उंब्रजकर इत्यादी प्राध्यापक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——-
संस्था पातळीवरील भरतीत आर्थिक व्यवहारांना प्राधान्य
कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात संघटनेने सद्यस्थितीतील भरती प्रक्रियेवर गंभीर बोट ठेवले आहे. सध्या महाविद्यालयांतील प्राध्यापक भरतीचे अधिकार संस्थास्तरावर असल्याने, गुणवत्तेपेक्षा आर्थिक व्यवहारांना प्राधान्य दिले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोनेशन घेतले जात असल्याने पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांवर मोठा अन्याय होत आहे. पर्यायाने, नव्या पिढीला घडविणाऱ्या प्राध्यापकांची निवड ही केवळ गुणवत्ता आणि पात्रतेच्या निकषांवरच होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी विद्यापीठ आणि शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संघटनेने या निवेदनाद्वारे केली आहे.
कुलगुरूंकडून सकारात्मक आश्वासन
निवेदन स्वीकारल्यानंतर कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव डॉ. लक्ष्मीकांत दामा तसेच विद्यापीठाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी मागासवर्गीय विद्यार्थी व प्राध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.





















