सोलापूर – जिल्हा परिषद कार्यालयात आयोजित शिक्षण व आरोग्य समितीच्या बैठकीत संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी आपल्या अडचणी, तक्रारी आणि मागण्या मांडत निवेदने सादर केली. यावर नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना व्हाव्यात, यासाठी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्याची माहिती शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतन सिंह केदार सावंत यांनी दिली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यासह आरोग्य व शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान शिक्षण व आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील प्रलंबित विषयांबाबत अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, तसेच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक सक्षम व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशील व उत्तरदायी पद्धतीने काम करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. नागरिकांचा विश्वास आणि सहभाग यांच्या बळावर विकासकामांना अधिक गती देत तळागाळातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कोट
“जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास”
नागरिकांच्या समस्या सोडवणे, शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देणे हेच आपल्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
चौकट
केंद्रप्रमुख नियुक्ती निरसन
नूतन ९९ केंद्रप्रमुखांचे समुपदेशन करून नियुक्ती प्रदान केली जाणार आहे. या नियुक्ती संबंधी कोणाची काही तक्रार असल्यास त्याचे निरसन करण्यात येणार आहे.
चौकट
जागेसह इमारतीची पाहणी
शहर जिल्ह्यातील आरोग्य केंद्र तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मालकीच्या इमारतीची आणि जागेची पाहणी करून धोकादायक अवस्थेत आलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या जागेवर अतिक्रमण वाढलेले आहेत. त्याची माहिती देखील घेतली जाणार आहे.
चौकट
गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा सत्कार
जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेश मिळवले आहे. अशा गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांसह कौशल्यपूर्ण शिक्षकांचा देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे त्याचे नियोजन केले जाणार आहे.
Post Views: 8