
सोलापूर – डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या ‘लिटिल चॅम्प’ स्पर्धेत ‘दास्ताने’ व ‘सलीम खान’ संघांने विजयी सलामी दिली.
असोसिएशनतर्फे १२ वर्षांखालील मुलांसाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘लिटिल चॅम्प’ क्रिकेट टूर्नामेंटचा जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर दिमाखात शुभारंभ झाला. पहिल्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणि पालकांनी एकत्र येऊन राष्ट्रगीत म्हटले. सोलापूरचा युवा खेळाडू यश बोरामणी याच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबर्सू उपस्थित होते.
या स्पर्धेतील सकाळच्या सत्रात उमेश दस्ताने ११ विरुद्ध खुद्दूस खान ११ यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना दस्ताने ११ संघाने ३० षटकांत २ बाद १७३ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात खुद्दूस खान संघाला २० षटकांत सर्वबाद ८३ धावाच करता आल्या. दस्ताने ११ संघाने ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला. संघाच्या या विजयात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रुद्र धोत्रे याने २ चेंडूत नाबाद ६ धावा केल्या आणि गोलंदाजीत ४ षटकांत १ मेडन टाकत अवघ्या ६ धावा देऊन ३ महत्त्वाचे बळी घेतले. त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
दुपारच्या सत्रात झालेल्या दुसऱ्या सामन्यात सलीम खान संघाने श्रीनिवास शिवल संघाचा ५ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीनिवास शिवल संघाचा डाव १९.२ षटकांत ७२ धावांवर संपुष्टात आला. ७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलीम खान संघाने १३.२ षटकांत ५ बाद ७३ धावा करत विजय नोंदवला. सलीम खान संघाच्या आदित्य चाटके याने भेदक गोलंदाजी करत ३.२ षटकांत १ मेडन ओव्हर टाकून अवघ्या ७ धावा देत ४ बळी घेतले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले.























