टेंभुर्णी – गावाच्या शिवारातील जुन्या सोलापूर–पुणे महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभुर्णी पोलीस ठाणे गु.र. नं. 418/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 125(A), 281, 324(4) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी रमेश कोंडीबा गायकवाड (वय 57, व्यवसाय शेती, रा. अकोले बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी म्हणून धर्मा नारायण आवचारे (रा. पेनूर, ता. मोहोळ) यांचे नाव नमूद करण्यात आले आहे.
ही घटना दिनांक 8 जून 2026 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी गावच्या हद्दीतील जुना सोलापूर–पुणे महामार्गावरील लक्ष्मी पार्क हॉटेल समोर घडली.
माहितीनुसार, महेश शंकर ओहोळ (वय 35, रा. पालवण, ता. माढा) व धर्मा नारायण आवचारे हे टेंभुर्णी येथील काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते. दरम्यान, कट पॉईंटवर अचानक एस.टी. बस सोलापूरच्या दिशेने वळल्याने पुढे जाणाऱ्या महेश ओहोळ यांच्या होंडा शाईन (एमएच 12 एमएम 9536) या दुचाकीवर अचानक ब्रेक लावण्यात आला.
त्याचवेळी मागून येणाऱ्या धर्मा आवचारे यांच्या होंडा युनिकॉर्न (एमएच 45 एडब्ल्यू 8534) या दुचाकीची समोरील वाहनाला जोरदार धडक बसली. या अपघातात महेश ओहोळ यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. तोंडातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर धर्मा आवचारे यांना किरकोळ दुखापत झाली असून दुचाकीचे सुमारे तीन हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ जगताप करीत आहेत.
Post Views: 16