
सोलापूर – यंदाची आषाढी वारी केवळ धार्मिक सोहळा न राहता वारकऱ्यांसाठी सुरक्षित, सुविधायुक्त आणि सुयोग्य व्यवस्थापनाचा आदर्श ठरावी, यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना जबाबदाऱ्या स्पष्टपणे सोपवल्या.
शनिवार दि. २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुणे, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे यांनी पालखी मार्गावरील रस्ते, पूल, रिंगण स्थळे आणि मुक्कामाच्या ठिकाणांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. वारकऱ्यांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून स्वच्छ पिण्याचे पाणी, तात्पुरती व कायमस्वरूपी स्वच्छतागृहे, स्नानगृहे, जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, मोबाईल चार्जिंग सुविधा, आरोग्य सेवा आणि औषध किट यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.
दरम्यान, पालखी विश्वस्तांनी वारकऱ्यांसाठी मोबाईल नेटवर्कची उपलब्धता वाढविणे आणि वारीतील वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी केली. यावर सकारात्मक विचार करण्याचे संकेत प्रशासनाने दिले.
चौकट
वारीतील लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, निरीक्षण मनोरे, ध्वनीक्षेपक व्यवस्था, अतिरिक्त मोबाईल नेटवर्क टॉवर्स तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. चंद्रभागा नदी परिसरात लाइफ जॅकेट आणि बोटींग सुविधा उपलब्ध करून देण्याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.
चौकट
यंदाच्या वारीत सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षा या त्रिसूत्रीवर भर देत प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली असून, लाखो वारकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि सुसज्ज वारी घडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
कोट
जिल्हा परिषदेमार्फत पालखी मार्गावर ५ हजार फिरती शौचालये, २२० पाण्याचे टँकर, १५८ तात्पुरती उपचार केंद्रे, १२१ बाईक ॲम्बुलन्स आणि ४५०० औषध किट दिंडी प्रमुखांना वितरित करण्यात येणार आहे. तसेच २३ ठिकाणी जर्मन हँगर उभारण्यात येणार असून पालखीतील मानाच्या घोडे, बैलांसाठीही चारा आणि निवाऱ्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
Post Views: 44