सोलापूर – नीट (यूजी) पुनर्परीक्षा रविवारी सोलापूर शहरातील १६ परीक्षा केंद्रांवर शांततापूर्ण वातावरणात आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडली. एकूण ५,९४७ विद्यार्थ्यांपैकी ५,४१९ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावत तब्बल ९१.१३ टक्के उपस्थिती नोंदवली. तर ५२८ विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या पुनर्परीक्षेसाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. प्रश्नपत्रिकांची वाहतूक, साठवणूक आणि वितरण प्रक्रिया केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व पोलिसांच्या देखरेखीखाली पार पडली. सर्व परीक्षा केंद्रांवर कडक तपासणी आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, मोठ्या परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद समाधानकारक राहिला. एस.व्ही.सी.एस. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे ४४१, एस.व्ही.सी.एस. हायस्कूल एमआयडीसी येथे ४३८, तर संगमेश्वर कॉलेज येथे ४४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. काही केंद्रांवर अनुपस्थितीचे प्रमाण तुलनेने अधिक दिसून आले.दिव्यांग प्रवर्गातील ३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर एक विद्यार्थी अनुपस्थित राहिला.
चौकट
कोणताही अनुचित प्रकार नाही
परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडला नसून संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. हरीभाई देवकरण परीक्षा केंद्रावर सकाळीच विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून आली. पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या नियोजनाचे स्वागत करत परीक्षा केंद्रावरील सुविधा व सुरक्षा व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.
चौकट
कागदपत्रांची पडताळणी
परीक्षा केंद्रांवर प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांची कागदपत्रे, ओळखपत्रे आणि आवश्यक तपासणी करण्यात आली. परीक्षा केंद्र परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया शांततापूर्ण आणि नियोजनबद्ध वातावरणात पार पडली.
चौकट
ठळक आकडेवारी
एकूण नोंदणीकृत विद्यार्थी : ५,९४७
परीक्षेला उपस्थित : ५,४१९
अनुपस्थित : ५२८
उपस्थिती टक्केवारी : ९१.१३%
दिव्यांग उमेदवार नोंदणीकृत : ३१
दिव्यांग उमेदवार उपस्थित : ३०
परीक्षा केंद्रे : १६
Post Views: 12