बार्शी – बदलत्या शैक्षणिक धोरणाच्या आणि तीव्र स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. तसेच, पालकांनी मुलांवर गुणांचे अवाजवी दडपण न आणता त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे, असे प्रतिपादन चाटे शिक्षण मनाती समूहातील तज्ज्ञांनी केले.
येथील ‘चाटे शिक्षण समूह’ बार्शी शाखेच्यावतीने इयत्ता ५ वी ते १० वी मधील विद्यार्थी व पालकांसाठी ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि स्टुडंट-पॅरेंट ओरिएंटेशन प्रोग्राम’चे नुकतेच भव्य आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या विशेष सत्राला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संस्थेची शैक्षणिक वाटचाल आणि कटिबद्धता
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चाटे शिक्षण समूह बार्शी शाखेचे संचालक प्रा. पांडुरंग घाडगे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात बार्शी शाखेच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बदलत्या शैक्षणिक प्रवाहात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
पालक नव्हे, मित्र बना: डॉ. भारत खराटे
्या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागाचे विभागीय संचालक प्रा. डॉ. भारत खराटे उपस्थित होते. त्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “आजच्या पालकांनी मुलांवर गुणांचे अवाजवी दडपण न आणता त्यांच्याशी सुसंवाद साधला पाहिजे. घरात अभ्यासासाठी पोषक आणि तणावमुक्त वातावरण निर्माण करणे ही पालकांची मोठी जबाबदारी आहे.” २१ व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतर (घोकंपट्टी) न करता संवाद कौशल्य, निर्णयक्षमता आणि मानसिक सक्षमता वाढवावी, यावर त्यांनी भर दिला.
शिक्षकांची बदलती भूमिका आणि
करिअरचा पाया : प्रा. मधुकर पाटील
शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. मधुकर पाटील यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या बदलांवर प्रकाश टाकला. आधुनिक काळात शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या क्षमतांना दिशा देणारा ‘मार्गदर्शक’ (Mentor) झाला आहे, असे सांगत त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे (NEP) मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आणि बहुविद्याशाखीय दृष्टिकोन कसा वाढणार आहे, हे सोप्या भाषेत समजावून सांगितले. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर करावा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ‘शिक्षक-पालक’ यांच्यात नियमित समन्वय असणे गरजेचे आहे, असे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले.
गुणवंतांचा गौरव अन् कर्मचाऱ्यांचे परिश्रम
याप्रसंगी विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चाटे शिक्षण समूहातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले व मोलाचे सहकार्य केले.
सूत्रसंचालन व आभार
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा कोरफळकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बालाजी माने यांनी मानले. केवळ दोन तासांचा हा कार्यक्रम मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत दिशादर्शक ठरल्याची भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली.
Post Views: 13