सोलापूर – आगामी आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा यंदा पंढरपुरात घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून पुढे आला आहे. यासाठीचा प्रस्ताव अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या टेबलावर असल्याचे सांगण्यात येत आहे. आषाढी यात्रेच्या तयारीचा आढावा प्रत्यक्ष ठिकाणी घेण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य पालखी मार्गासह विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत.
चार वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळानंतर जिल्हा परिषदेत नव्याने लोकप्रतिनिधींचे नेतृत्व आले आहे. त्यामुळे नव्या सदस्यांना जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाची माहिती मिळावी आणि यात्रेपूर्व तयारीची प्रत्यक्ष पाहणी करता यावी, या उद्देशाने सर्वसाधारण सभा पंढरपुरात आयोजित करण्याचा विचार सुरू आहे.
यंदाच्या आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारीला सुरुवात केली असून, वारकरी, भाविक आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि सदस्य पालखी मार्गावरील सुविधा, स्वच्छता व्यवस्था, पिण्याचे पाणी, रस्ते आणि अन्य विकासकामांचा आढावा घेणार आहेत.
सर्वसाधारण सभेची तारीख आणि वेळ निश्चित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून तयारी सुरू आहे. विधानसभा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर या संदर्भातील निर्णय प्रक्रियेला गती मिळाली असून, जूनअखेरीस सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चौकट
जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच तालुक्याच्या ठिकाणी सर्वसाधारण सभा घेण्याचा प्रयोग होत असल्याने या बैठकीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधी आणि वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले आहे. यात्रेच्या नियोजनाला अधिक परिणामकारक दिशा देण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
Post Views: 33