
सोलापूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सर्व कनिष्ठ अभियंते व उपअभियंते यांनी कोणतीही रजा न घेता सतर्क राहून कामांचे नियमित निरीक्षण करावे, तसेच आवश्यक ठिकाणी तातडीने कार्यवाही करून वारी व्यवस्थापन सुरळीत पार पाडावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विकास बुळा, नेताजी खंडागळे, प्रदीप खांडेकर, सचिन जाधव, अश्विनी चिवटे आणि अतुल पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद सोलापूर येथे झालेल्या बांधकाम समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. सभेत मागील बैठकीतील ठरावांच्या पूर्ततेची नोंद घेण्यात आली. शासनाकडून प्राप्त महत्त्वाच्या पत्रे, परिपत्रके आणि शासन निर्णयांचे वाचन करण्यात आले. यावेळी बांधकाम विभाग क्रमांक १ व २ मार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांवरील खर्च, मंजूर निविदा, रस्ते विकासकामे आणि तालुकानिहाय अंगणवाडी इमारत बांधकामांची सद्यस्थिती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध कामांची गती वाढवून प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
सभेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणासंदर्भात महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेत ऊर्जा बचत व पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्याबाबत चर्चा झाली. मंजूर विकासकामे पूर्ण झाल्यानंतर त्या परिसरात वृक्षारोपण करण्याच्या मागील सूचनांच्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
वृक्षसंवर्धन आणि हरित विकासासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेकडील मोक्याच्या जागांची पाहणी करून त्यांचा विकास आणि उत्पन्नवाढीसाठी उपयोग करण्याबाबत माहिती संकलनाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला.
चौकट
आषाढी वारी नियोजनासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची ३० जूनला बैठक
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून वारी व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी मंगळवार, दि. ३० जून रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वारी व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभागप्रमुख या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत वारी मार्गावरील सुविधा, रस्त्यांची स्थिती, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच विविध विभागांमधील समन्वयाचा आढावा घेण्यात येणार आहे.
– इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम विभाग
चौकट
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन हे बैठकीस उपस्थित राहून आवश्यक सूचना देणार आहेत. आषाढीवारी काळात भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये. प्रशासनाची यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत राहावी, यासाठी या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Post Views: 17