सोलापूर : महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील विविध विकासकामांचा महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. विकास निधी तसेच एनटीपीसीच्या सीएसआर निधीतून सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता, प्रगती आणि पूर्ततेचा कालावधी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी पूर नियंत्रण, स्वच्छता आणि अतिक्रमण निर्मूलनावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी अतिक्रमण नियंत्रण अधिकारी नीलकंठ मठपती, विभागीय अधिकारी जावेद पानगल, डॉ. सतीश चौगुले, गोकुळ चिंतारे, अविनाश वाघमारे, चेतन प्रचंडे, स्वप्नील सोलणंकर, अभियंते व संबंधित अधिकारी उपस्थित होते.पाहणीदरम्यान आयुक्तांनी मोरांसाठी उभारण्यात आलेल्या नव्या पिंजऱ्याची तसेच वाघ आणि बिबट्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक पिंजऱ्यांची पाहणी केली. एनटीपीसीच्या सीएसआर निधीतून प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या विशेष निवाऱ्यांचाही त्यांनी आढावा घेतला. सर्व विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
संग्रहालयाशेजारील मैदानात वाढलेली वेडी बाभळीची झाडे मुळासकट काढून परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्राणी संग्रहालय परिसरातील स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
पाहणीवेळी परिसरातील एका विहिरीवर रेल्वे प्रशासनाकडून दावा करण्यात येत असल्याची बाब समोर आली. याबाबत संबंधित जागेच्या मालकी हक्काची माहिती रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत पत्राद्वारे मागविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
महात्मा गांधी प्राणी संग्रहालय हे शहरातील महत्त्वाचे पर्यावरणीय आणि पर्यटनस्थळ आहे. येथे सुरू असलेली विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. प्राण्यांच्या सुरक्षिततेबरोबरच नागरिकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून पूर नियंत्रण, स्वच्छता आणि अतिक्रमण निर्मूलनाला प्राधान्य दिले जाईल, असे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
सर्व अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे आदेश
आधार हॉस्पिटल ते मंदिर परिसरादरम्यानच्या रस्त्यालगत आणि महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले. अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिल्या.
नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण युद्धपातळीवर करा
प्राणी संग्रहालय परिसरात यापूर्वी पाणी साचल्याच्या घटनांची दखल घेत आयुक्तांनी संग्रहालयालगतच्या नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले. पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत राहून पूरस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Post Views: 42