सोलापूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत विभागातील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासकीय सुट्टी असतानाही २६ ते २८ जून या तीन दिवसांत जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग कार्यरत ठेवण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील प्रलंबित प्रशासकीय कामे तसेच आषाढी वारीच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहून कामकाज पार पाडावे लागणार आहे.
परिपत्रकानुसार या तीन दिवसांतील कार्यालयीन उपस्थितीचा स्वतंत्र अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच आदेशाच्या अंमलबजावणीत कोणतीही हयगय होऊ नये, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
आषाढी वारीच्या काळात ग्रामपंचायतींशी संबंधित विविध कामे, मंजुरी प्रक्रिया, प्रशासकीय पत्रव्यवहार आणि प्रलंबित प्रस्तावांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सुट्टीच्या काळातही कार्यालय सुरू राहणार असल्याने विकासकामांना गती मिळण्याबरोबरच वारीपूर्व तयारी अधिक प्रभावीपणे पूर्ण होण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदेशाचे काटेकोर पालन करून नियोजित कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
कोट
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत विभागातील प्रलंबित कामे विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार २६ ते २८ जून या शासकीय सुट्टीच्या कालावधीतही विभागाचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदेशाचे काटेकोर पालन करून उपस्थित राहावे आणि कामे वेळेत पूर्ण करावीत,” असे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी सांगितले.
Post Views: 47