सोलापूर : महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांना महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने उपायुक्त (गट-अ) संवर्गात पदोन्नती जाहीर केली आहे. महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील सहाय्यक आयुक्त (गट-ब) संवर्गातून गट-अ संवर्गात बढती मिळाली आहे.
नगरविकास विभागाने २२ जून २०२६ रोजी जारी केलेल्या शासन आदेशानुसार राज्यातील २५ अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात गट-अ संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांचा समावेश असून, त्यांना उपायुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमानंतर जारी करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांना पदोन्नती देवून, कार्यरत पदावर ठेवण्यात येत आहे. या पदावर रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांचा विलंब क्षमापित करण्यात येईल, जेणेकरुन त्यांची संवर्गातंर्गत सेवा ज्येष्ठता अबाधित राहील. शासनाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
गिरीश पंडित यांनी सोलापूर महानगरपालिकेत विविध विभागांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळताना शिस्तबद्ध प्रशासन, विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. गिरीश पंडित यांच्या पदोन्नतीबद्दल सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सहकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
Post Views: 13