अक्कलकोट – तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेबाबत मंगरुळे फंक्शन हॉल, अक्कलकोट येथे काँग्रेस पक्षाचे BLA-2, बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे अध्यक्षस्थानी तर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार प्रमुख उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी केले.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे आणि प्रशिक्षिका रोहिणी धोत्रे यांनी कार्यकर्त्यांना SIR प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रास्ताविक अक्कलकोट तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष गजानन जक्कीकोरे यांनी केले.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा केवळ घटनात्मक अधिकार नसून भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. मात्र, भाजप सरकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्याचा प्रयत्न करत आहे. विविध राज्यांमध्ये राबविण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, यासाठी सर्व BLA-2, बूथ प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एसआयआर प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवावे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी पश्चिम बंगालमधील उदाहरण देताना सांगितले की, विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान सुमारे ९१ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. तसेच भाजपने जिंकलेल्या २०७ जागांपैकी ९५ जागांवर वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या ही विजयाच्या फरकापेक्षा अधिक होती. त्यामुळे मतदार यादीतील बदलांमुळे तेथील राजकीय समीकरणांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. अशी परिस्थिती महाराष्ट्रात आणि विशेषतः अक्कलकोट तालुक्यात निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, नागरिकांना कोणत्याही कारणामुळे मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागू नये. लोकशाही मजबूत ठेवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे, बेरोजगारीमुळे तसेच नीट, टी. ई. टी. सारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे पेपरफुटीच्या घटनांमुळे युवकांचे भविष्य अंधारात जात आहे. या सर्व प्रश्नांवर काँग्रेस पक्षाने सामान्य जनतेचा आवाज बुलंद करून सरकारला जाब विचारला पाहिजे. पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष आणि विविध लोकशाही मार्गाने आंदोलने उभारण्याची गरज आहे.
या शिबिरास खासदार प्रणिती शिंदे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार, अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, अक्कलकोट तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष गजानन जक्कीकोरे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण जाधव, प्रशिक्षिका रोहिणी धोत्रे, नगरसेवक मुस्तफा बळोरगी, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद पाटील, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, काकासाहेब पाटील यांच्यासह BLA-2, बूथ प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.