सोलापूर – रस्ता अपघातात जखमी झालेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री रोड ॲक्सिडेंट हेल्थ असिस्टन्स अँड ट्रीटमेंट पी.एम.राहत’ योजनेअंतर्गत आता पहिल्या ४८ तासांत ₹१.५० लाखांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध होणार आहेत. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने अधिकृत आदेश जारी करत सोलापूर जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त सरकारी व खासगी रुग्णालयांना या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या मागणीला यश आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी या मागणीचे निवेदन कोठे यांनी गडकरी यांच्याकडे दिले होते.
दरम्यान, या योजनेमुळे रस्ता अपघातानंतर उपचारासाठी पैशांची अडचण निर्माण होणार नाही. अपघातग्रस्ताला तातडीने उपचार मिळावेत आणि ‘गोल्डन अवर’मध्ये जीव वाचविण्याचे प्रमाण वाढावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. रुग्णाकडे विमा असो वा नसो, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर उपचाराचा खर्च केंद्र सरकारकडून संबंधित रुग्णालयाला अदा केला जाणार आहे.
योजनेनुसार अपघातग्रस्ताला कोणत्याही जाती, धर्म किंवा आर्थिक निकषाशिवाय पहिल्या ४८ तासांत ₹१.५० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील. उपचार सुरू करताना रुग्णालयाने एमजेपीजेएवाय/एबी-पीएमजेएवाय टीएमएस २.० पोर्टलवर नोंदणी करून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच एफआयआर किंवा मेडिको-लीगल केस (एमएलसी) नोंद अनिवार्य करण्यात आली आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य आयएमए अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रस्ता अपघातग्रस्तांना संपूर्ण उपचार सहाय्य मिळावे, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी अधिक गतीने सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा दोईफोडे यांनी जिल्ह्यातील सर्व संबंधित रुग्णालयांना आदेश देत अपघातग्रस्तांना तातडीने उपचार देण्याचे आणि योजनेचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चौकट
ठळक मुद्दे

रस्ता अपघातग्रस्तांसाठी ₹१.५० लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

पहिल्या ४८ तासांतील उपचार खर्च केंद्र सरकारकडून

सरकारी व मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांत सुविधा

टीएमएस २.० पोर्टलवर नोंदणी अनिवार्य

एफआयआर किंवा एमएलसी नोंद आवश्यक

उपचारासाठी आर्थिक अडचण ठरणार नाही; ‘गोल्डन अवर’मध्ये जीव वाचविण्यास मदत होणार.
Post Views: 33