
सोलापूर – येथील इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित ‘इंडियन मॉडेल महिला पेरेंट्स क्रिकेट लीग सिझन-२’ मध्ये चुरशीच्या सामन्यांमध्ये पॉवर मॉम आणि रायझिंग स्टार मॉम या संघांनी शानदार विजय नोंदवले.
स्पर्धेतील तिसरा सामना ‘पॉवर मॉम’ विरुद्ध ‘ रॉयल मॉम स्ट्रायकर्स’ यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना पॉवर मॉम संघाने ७ षटकांत १ बाद ४७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉयल मॉम स्ट्रायकर्सचा संघ ४.३ षटकांत ६ बाद अवघ्या १९ धावांवर आटोपला. हा सामना पॉवर मॉम संघाने २८ धावांनी जिंकला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल अस्मिता अंबुरे यांना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
चौथा सामना ‘ वॉरियर’ विरुद्ध ‘रायझिंग स्टार मॉम’ यांच्यात खेळवला गेला. वॉरियर संघाने ७ षटकांत २ बाद ३७ धावा केल्या. हे आव्हान रायझिंग स्टार मॉम संघाने ६ षटकांत ४ बाद ३८ धावा करत सहज पार केले आणि २ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात आरती काजळे यांना सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
पाचव्या सामन्यात ‘आयएमएस थंडर्स क्वीन्स’ आणि ‘आयएमएस पॉवर मॉम’ हे संघ आमनेसामने होते. पॉवर मॉम संघाने दमदार फलंदाजी करत ७ षटकांत १ बाद ५४ धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना थंडर्स क्वीन्सचा संघ ६.४ षटकांत ७ बाद २५ धावांवर बाद झाला. पॉवर मॉम संघाने हा सामना २९ धावांनी खिशात टाकला. या सामन्यातही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या अस्मिता अंबुरे यांना सलग दुसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार देण्यात आला.




















