सोलापूर : आर्द्रा नक्षत्राच्या मुसळधार पावसाने रविवारी सोलापूर शहराला चांगलेच झोडपून काढले. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचणे, घरांमध्ये पाणी शिरणे, ड्रेनेज तुंबणे तसेच झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला एकाच दिवसात तब्बल ४१ तक्रारी प्राप्त झाल्या.
विशेष म्हणजे, प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेत संबंधित विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत सर्व तक्रारींचे निवारण केले. शहरातील नई जिंदगी परिसरातील सिद्धेश्वर नगर, अक्कलकोट रस्त्यावरील कर्णिक नगर येथील शनी मंदिर परिसर, निर्मिती विहार, जगजीवन राम झोपडपट्टीलगतचे दुर्गा मंदिर, मोदीखाना, रामलाल चौक, रामलाल चाळ परिसर, प्रभाग क्रमांक २० मधील ब्रह्मदेव नगर, गैबीपीर झोपडपट्टी, महेश नगर पार्किंग, सलगर वस्ती रिक्षा स्टॉप, न्यू हायस्कूललगतचा गणेश नगर, जय भवानी मैदान, गवळी वस्ती, देगाव नाका, पारशी विहीर, कादरी हॉस्पिटल परिसर, इकारा मशिद, राजेश्वरी नगर तसेच जुन्या आयएमएस शाळेजवळील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. संबंधित ठिकाणी पाणी उपसण्यासह ड्रेनेजची सफाई करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
याशिवाय, कुमठेकर हॉस्पिटलजवळील बगीचा परिसर आणि आसरा कल्याण नगर येथील डी-मार्टजवळ झाडे कोसळल्याच्या तक्रारीही नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्या. महापालिकेच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली.
मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत निर्माण झालेल्या परिस्थितीवर महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेने रात्रभर सतर्क राहून काम केले. नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत सर्व ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्याने संभाव्य मोठे नुकसान टळल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Post Views: 8