सोलापूर – शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, संशोधन कार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या विशेष परिश्रमांची दखल घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, ‘लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेल’च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा पुरस्कार प्रा. डॉ. औदुंबर मस्के, माजी नगरसेवक बबलू गायकवाड आणि चॅनेलचे संपादक संगप्पा कांबळे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर कसबे व मनिषा तुपसाखरे यांनी केले, तर डॉ. सिद्धार्थ तळभंडारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
’एआय’च्या जमान्यात सामाजिक मूल्ये टिकवणे गरजेचे: डॉ. भासके
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. भासके यांनी बदलत्या शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकताना म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, नम्रता आणि शिस्त असणे आवश्यक आहे. आजच्या ‘एआय’च्या युगात नवीन पिढी प्रगत, गतिमान आणि व्यावहारिक होत असली, तरी त्यांच्यातील मूलभूत संस्कार आणि सामाजिक मूल्ये कमी होत आहेत, ही चिंतेची बाब आहे. शिक्षण, नोकरी आणि करिअरच्या बदलत्या प्रवाहात विद्यार्थी व पालकांनी आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये सतत सुसंवाद असणे आवश्यक आहे.बदलत्या परिस्थितीत स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारणे गरजेचे आहे. आजच्या काळात ‘अर्थार्जन करत शिक्षण घेणे’ (कमवा आणि शिका) ही काळाची गरज बनली असून, यासाठी शासनही प्रयत्नशील आहे.”




















