पंढरपूर – येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने डिग्री इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘जपानी भाषा आणि करिअरच्या संधी’ या विषयावर एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना जागतिक रोजगाराच्या संधी, जपानी भाषा, संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय करिअरविषयी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळेस ‘मोसाईक प्रायव्हेट लिमिटेड’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हिरो इशिदा हे प्रमुख अतिथी व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच इंडो-जपान कौन्सिलचे श्रीकांत गुंजाळ यांनी विशेष वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ट्रेनिंग व इंडस्ट्री इंटरएक्शन अधिष्ठाता प्रा. रविराज माढेकर यांनी प्रास्तविकातून या कार्यशाळेच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना हिरो इशिदा यांनी जपानी भाषा, संस्कृती, शिस्त, कार्यपद्धती आणि जपानी उद्योगविश्वातील संधी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून जपानी भाषा आत्मसात करण्याचा प्रवास आणि त्यातून मिळालेल्या यशस्वी संधी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.
श्रीकांत गुंजाळ यांनी भारत-जपान औद्योगिक संबंध, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील करिअरच्या संधी, तसेच जपानी भाषा अवगत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या आकर्षक रोजगाराच्या संधींची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी प्लेसमेंट अधिष्ठाता डॉ. अभिषेक, पुण्यातील प्रा. राहुल डोले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सूत्रसंचालन सोनाली कांबळे यांनी केले व ट्रेनिंग व इंडस्ट्री इंटरएक्शन अधिष्ठाता प्रा. रविराज माढेकर यांनी आभार मानले.
Post Views: 17