बार्शी – श्रीकाशी जगद्गुरु विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ, जंगमवाडी मठ (वाराणसी) आणि वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळ, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वीरशैव सिद्धांत परीक्षेला बार्शीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी (दि. ५ जुलै) न्यू हायस्कूल, लोखंड गल्ली, बार्शी येथे परीक्षा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
या परीक्षेस एकूण २०६ महिला व पुरुष परीक्षार्थींनी सहभाग नोंदविला. त्यापैकी प्रबोध परीक्षेसाठी १८७ तर प्रवीण परीक्षेसाठी १९ परीक्षार्थी बसले. विशेष म्हणजे, या परीक्षेत महिलांचा सहभाग लक्षणीय असून धार्मिक व वैचारिक शिक्षणाबाबत महिलांमध्ये वाढती जागरुकता दिसून आली.
या उपक्रमास श्री.ष.ब्र. श्री १०८ राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज (परंडकर मठ संस्थान, बार्शी) तसेच श्री.ष.ब्र. श्री १०८ श्रीगुरु प्रभुदेव शिवाचार्य माढेकर महाराज (माढेकर मठ संस्थान, माढा) यांचे आशीर्वाद लाभले.
वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळ, बार्शीचे रावसाहेब मनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे नियोजन करण्यात आले. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रसंचालक संतोष खुडे, डॉ. अनंत बिडवे, प्रविण महाराज, योगेश घंटे आणि धनंजय धारुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे परीक्षा सुरळीत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
धार्मिक शिक्षण, वीरशैव तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि नव्या पिढीत संस्कारांची जोपासना करण्याच्या दृष्टीने अशा परीक्षांचे महत्त्व मोठे असून, बार्शीतील या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
Post Views: 11