बार्शी – राज्यात गेल्या दोन दशकांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरतीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने येत्या ८ जुलै २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात राज्यभरातील हजारो बी.पी.एड. व एम.पी.एड. पात्र शारीरिक शिक्षण शिक्षक सहभागी होणार असून आंदोलन शांततामय आणि कायदेशीर मार्गाने करण्यात येणार असल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे.
रखडलेल्या पदभरतीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील हजारो बी.पी.एड. व एम.पी.एड. पात्र शिक्षक मुंबईत धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.
महासंघाच्या निवेदनानुसार, शारीरिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सक्षम समाज आणि बलशाली राष्ट्रनिर्मितीसाठी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी शारीरिक शिक्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून क्रीडा शिक्षकांच्या पदभरतीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हजारो प्रशिक्षित युवक-युवती आजही बेरोजगार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महासंघाने क्रीडा शिक्षकांची सेवा प्रवेश नियमावली व सेवा शर्ती तातडीने जाहीर करुन भरती प्रक्रिया सुरु करावी, शासन निर्णयानुसार मंजूर ४,८६० क्रीडा शिक्षकांची सर्व पदे पवित्र पोर्टल (TAIT-2025) च्या पहिल्या टप्प्यात भरावीत, रिक्त शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदांवर इतर विषयांच्या शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा व समाजकल्याण विभागातील सर्व रिक्त क्रीडा शिक्षकांची पदे तातडीने भरण्यात यावीत, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.
या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महासंघाचे मार्गदर्शक प्रद्युम्न जोशी, कैलास माने, विश्वनाथ पाटोळे, अमोल जोशी, राज्याध्यक्ष संदीप मनोरे, राज्य सचिव तायाप्पा शेंडगे, अमोल मिरगणे तसेच राज्य, विभागीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व पात्र शारीरिक शिक्षण शिक्षकांना केले आहे.
Post Views: 11