जेऊर – विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता, आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची भावना दृढ करण्यासाठी दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज येथे महाराष्ट्र पोलीस दलाच्या निर्भया पथकाच्या वतीने विशेष जनजागृती व आत्मसंरक्षण प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पाटील होते.
यावेळी पोलीस हवालदार मंगेश पवार यांनी पोक्सो (POCSO) कायदा, बालकांचे लैंगिक शोषण व अत्याचारापासून संरक्षण, घरगुती हिंसाचार प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच महिलांच्या व बालकांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या विविध कायदेशीर तरतुदींची विद्यार्थ्यांना सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत माहिती दिली. कोणत्याही प्रकारची छेडछाड, धमकी किंवा अत्याचार सहन न करता त्वरित पालक, शिक्षक किंवा पोलिसांशी संपर्क साधणे हीच खरी सुरक्षिततेची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वसंरक्षण म्हणजे केवळ प्रतिकार नव्हे, तर प्रसंगावधान, धैर्य आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असल्याचे सांगत पोलीस हवालदार मंगेश पवार यांनी विविध आत्मसंरक्षण तंत्रांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनीही या प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्यक्ष सहभाग घेतला.
यावेळी अल्पवयीन मुलांनी दुचाकी वाहन चालविणे हा मोटार वाहन अधिनियम अंतर्गत दंडनीय प्रकार असून, अशा कृत्यामुळे स्वतःसह इतरांच्याही जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे अल्पवयीन विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत वाहन चालवू नये, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षक कल्याणराव साळुंके, सीताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव तसेच सेवक किशोर कदम, संतोष घोरपडे आणि नंदकुमार कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांच्या हस्ते पोलीस हवालदार मंगेश पवार यांचा तर शिक्षक संतोष शिंदे यांच्या हस्ते पोलीस कॉन्स्टेबल गणेश गुटाळ यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक कल्याणराव साळुंके यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक संतोष शिंदे यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत सजगता, महिलांप्रती आदर, बालहक्कांविषयी संवेदनशीलता आणि आत्मसंरक्षणाची तयारी निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला.