बार्शी – मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२६ मध्ये बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थीनी कुमारी हुमेरा रियाज पठाण हिने २५६ गुण मिळवत केंद्रात ५ वा, सोलापूर जिल्ह्यात १४ वा आणि राज्यात २२ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मंथन वेल्फेअर फाउंडेशन, अहिल्यानगर आणि मंथन सामान्य ज्ञान परीक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ बार्शी येथील माऊली लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात राज्यभरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत, कार्यक्रमाचे आयोजक श्री. नवले, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कुमारी हुमेरा रियाज पठाण हिचा शाळा प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे तसेच धर्मादाय निरीक्षक भूषण चोबे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
हुमेरा हिने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे महाराष्ट्र विद्यालयासह बार्शी शहराच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
Post Views: 13