वेळापूर – फळवणी ता. माळशिरस येथील वृद्ध महिला तुळसाबाई पांडुरंग लोहार (वय ८५) यांचे रविवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. सकाळी त्यांच्या अंत्यविधीवेळी फळवणी ओढ्यालगत असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवरून वाद निर्माण झाल्याने गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून अंत्यविधीची तयारी सुरू केल्याने खळबळ उडाली. अखेर वेळापूर पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा वाद निवळला आणि मूळ जागी अंत्यविधी पार पडला.
रविवारी सकाळी ६ वाजता समाजातील नागरिकांनी फळवणी ओढ्यालगत असलेल्या पारंपरिक स्मशानभूमीच्या जागेत अंत्यविधीसाठी लागणारे सरपण टाकले. मात्र, ‘ही स्मशानभूमी आमच्या वैयक्तिक मालकीच्या जागेत आहे, त्यामुळे येथे अंत्यविधी करू नका,’ अशी भूमिका स्थानिक शेतकरी यांनी घेतली. अंत्यविधी करण्यास विरोध झाल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले. त्यांनी थेट मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आणून ठेवला व तेथेच सरपण रचून अंत्यविधी करण्याची तयारी सुरू केली.
घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. कोणताही अनर्थ किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता, त्यांनी ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाला घटनास्थळी पाचारण केले. “प्रशासन यावर कायमस्वरूपी मार्ग काढेल,” असे आश्वासन देत सपोनि कांबळे यांनी नातेवाईक व ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर मृतदेह पुन्हा ओढ्यालगतच्या पूर्वरत ठिकाणी नेऊन शांततेत अंत्यविधी पार पाडण्यात आला.
“गेली अनेक वर्षे ओढ्यालगत याच जागेवर अंत्यविधी केले जातात. काही वर्षांपूर्वी आलेल्या पूरपरिस्थितीत येथील स्मशानभूमीचे शेड वाहून गेले होते. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने यावर कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. प्रशासनाच्या याच उदासीनतेमुळे आज हा वाद इतका वाढला,” अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या.
अंत्यविधी पार पडल्यानंतर या गंभीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी फळवणी ग्रामपंचायतीसमोर तात्काळ ‘विशेष ग्रामसभा’ आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेला माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, वेळापूरचे सपोनि आशिष कांबळे, पिलीवचे मंडल अधिकारी विजय एकतपुरे, फळवणीचे ग्रामविकास अधिकारी अमर आतार, सरपंच माधुरी सुरवसे, माजी सरपंच सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते जोतिराम अवताडे, डॉ एच के आवताडे, पोलीस पाटील गणेश आवताडे,यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पूर्वीच्याच ओढ्यालगतच्या जागेवर स्मशानभूमी कायम ठेवण्यात यावी, यासाठी महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती कागदपत्रे तातडीने सादर करावीत आणि शासकीय मंजुरी मिळवून हा प्रश्न कायमचा निकाली काढावा, असे या ग्रामसभेत एकमताने ठरले.
चौकट
प्रशासनाने प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला!
“दोन वर्षांपूर्वी गावातील विविध विकासकामांच्या मुद्द्यांबरोबरच स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी मी स्वतः उपोषण केले होते. उपोषणादरम्यान प्रशासनाने हा तोडगा काढण्याचे केवळ आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न करता हा संवेदनशील प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. आजच्या प्रसंगाला प्रशासनाचा हलगर्जीपणाच जबाबदार आहे.” ज्योतीराम आवताडे (सामाजिक कार्यकर्ते)
चौकट
आहे त्याच जागी प्रशस्त स्मशानभूमी व्हावी!
“स्मशानभूमी हा जात-पात विसरून सर्वच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आणि भावनेचा प्रश्न आहे. त्यामुळे ही स्मशानभूमी इतरत्र कुठेही न हलवता, आहे त्याच जागी सर्व सोयींनीयुक्त अशी प्रशस्त करावी. यासाठी गावातील सर्वांनीच सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे.”
सचिन पाटील (माजी सरपंच, फळवणी)
Post Views: 10