सोलापूर – वरिष्ठ गटाच्या ७९ व्या राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेतील डायव्हिंग प्रकारात येथील डायव्हर्सनी एक सुवर्ण, तीन रौप्य व एक कास्य अशी पाच पदकांची कमाई केली.

चेन्नई येथील डॉ. टी. के. पारिवेदार ॲक्वाटिक कॉम्प्लेक्स, एसआरएम आयएसटी, कट्टनकुलाथुर येथे या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशी, श्रीगणेश उडता, संकेत लिगाडे आणि मनस्वी माने यांनी ही कामगिरी केली.
या राष्ट्रीय स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशी हिने ३ मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग प्रकारात सुवर्णपदक आणि हायबोर्ड डायव्हिंग प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. श्रीगणेश उडता याने हायबोर्ड सिंक्रोनाईज्ड डायव्हिंग प्रकारात रौप्यपदक पटकावले, तर संकेत लिगाडे याने हायबोर्ड डायव्हिंग प्रकारात कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेत अवघ्या १४ वर्षांची मनस्वी माने हिने सर्वांत लहान वयाची स्पर्धक असूनही अत्यंत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने खेळ केला. तिने ३ मीटर स्प्रिंगबोर्ड प्रकारात उत्कृष्ट कौशल्याचा ठसा उमटवत रौप्यपदक पदरात पाडून घेतले. तिच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे.
या सर्व विजेत्या खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक मनीष भावसार आणि श्रीकांत शेटे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या दैदीप्यमान यशाबद्दल सोलापूर जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुदेश देशमुख, सचिव संतोष कोल्हापुरे व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसह दोन्ही प्रशिक्षकांचे अभिनंदन केले . या खेळाडूंना सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी नझीर शेख यांचेही सहकार्य लाभले.





















