सोलापूर – भिगवण गुड्स शेड आणि भुसावळ विभागातील भुसावळ गुड्स शेड येथून ऑटोमोबाईलच्या वाहतुकीची (लोडिंगची) यशस्वी सुरुवात करून मध्य रेल्वेने आपल्या मालवाहतूक व्यवसायात दोन महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. या कामगिरीमुळे मालवाहतुकीचा एक नवीन स्रोत उपलब्ध झाला असून, ग्राहक-केंद्रित लॉजिस्टिक्स सेवा आणि मालवाहतुकीतील वैविध्य वाढवण्याबाबतची मध्य रेल्वेची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
दौंड आणि मनमाड विभाग पुणे विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर, सोलापूर विभागाने १९ जुलै २०२६ रोजी भिगवण गुड्स शेडमधून पहिली ऑटोमोबाईल लोडिंग पूर्ण केली असून, मालवाहतूक व्यवसायातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. १०० वाहने वाहून नेणाऱ्या २५ ‘एनएमजी’ वॅगन्सची पहिली ‘एनएमजी’ रॅक भिगवण गुड्स शेडमधून आसाममधील कामरूप जिल्ह्यातील ‘नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वे’च्या रंगिया विभागातील ‘बी.आर. ट्रान्सकॉन लिमिटेड गुड्स कार्गो टर्मिनल’कडे यशस्वीरीत्या रवाना करण्यात आली. या पहिल्यावहिल्या वाहतुकीतून २१ लाख रुपयांचे मालवाहतूक उत्पन्न मिळाले.
२४ जुलै २०२६ रोजी, भुसावळ गुड्स शेडमधून दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बेंगळुरू विभागातील निडवंडा येथे पाठवण्यासाठी २५ ‘एनएमजी’ वॅगन्स आणि १०० ऑटोमोबाईल्स असलेली पहिली ‘एनएमजी’ रॅक यशस्वीपणे लोड करण्यात आली. या पहिल्यावहिल्या लोडिंगमधून १४.८२ लाख रुपयांचे मालवाहतूक उत्पन्न मिळाले. मालवाहतुकीच्या व्यवसायाच्या नवीन संधी विकसित करण्याबाबत विभागाच्या ‘बिझनेस डेव्हलपमेंट युनिट’ने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले.



















