टेंभुर्णी – भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली असून, पूरनियंत्रणासाठी विविध धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या वाढत्या विसर्गाचा थेट परिणाम उजनी धरणावर होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली असून, येत्या काही दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी भर पडण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
रविवार (दि. २६ जुलै) सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, खडकवासला प्रकल्पातील धरणांसह पवना, चासकमान, भामा-आसखेड, घोड, आंद्रा, कळमोडी आणि वीर धरणांमध्ये ८५ ते १०० टक्क्यांदरम्यान उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नदीपात्र सुरक्षित ठेवण्यासाठी धरणांतून सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे.
सध्या मुळशी धरणातून १०,००० क्युसेक्स, पवना धरणातून ७,४५० क्युसेक्स, चासकमान धरणातून १५,००० क्युसेक्स, घोड धरणातून १२,००० क्युसेक्स, वीर धरणातून १३,९११ क्युसेक्स, भामा-आसखेड धरणातून ४,३९६ क्युसेक्स, वडिवळे धरणातून ४,७०४ क्युसेक्स आणि खडकवासला धरणातून २,९९६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या सर्व धरणांतील पाणी भीमा नदीमार्गे उजनी धरणाकडे येत असल्याने धरणातील आवक आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे.
उजनी धरणाची पाणीपातळी सध्या ४९६.२०० मीटरवर पोहोचली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा १०९.९५ टीएमसी, तर उपयुक्त (जिवंत) पाणीसाठा ४६.३० टीएमसी इतका झाला असून, उपयुक्त साठ्याची टक्केवारी ८६.४२ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणाचे जलसाठा क्षेत्र ३१७.८२ चौ. कि.मी. इतके नोंदविण्यात आले आहे.
दौंड नदी मापन केंद्रावरून ५०१.१०० मीटर पाणीपातळीची नोंद झाली असून, उजनी धरणात तब्बल ५५,३१९ क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. ही आवक कायम राहिल्यास उजनीचा जलसाठा झपाट्याने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या धरणाच्या सांडवा, वीजनिर्मिती केंद्र आणि रिव्हर स्लुईसमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नसला, तरी सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी २८० क्युसेक्स, दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी ९० क्युसेक्स, भीमा-सीना बोगद्यासाठी ९०० क्युसेक्स आणि मुख्य कालव्यातून २,००० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.
भीमा खोऱ्यातील पावसाचा जोर कायम राहिल्यास वरच्या धरणांमधील विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीस्थितीवर जलसंपदा विभागाचे बारकाईने लक्ष असून, नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 9