सोलापूर : उजनी धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे यंदा पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे. तसेच भीमा नदीकाठच्या शेतीपंपांसाठी मंगळवारपासून पूर्ववत आठ तास वीजपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, नदीपात्रात पाण्याची कमतरता असल्यामुळे सुरुवातीला शेतीपंपांसाठी तीन तास, त्यानंतर पाच तास वीजपुरवठा करण्यात येत होता. मात्र आता उजनी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या सिंचनाची गरज लक्षात घेऊन मंगळवारपासून आठ तासांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू केला जाणार आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या सिंचनाला मोठा दिलासा मिळणार आहे.
पालकमंत्री गोरे यांनी सोलापूरकरांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की, २ ऑगस्टपासून सोलापूर–मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. ही सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या चार दिवशी उपलब्ध राहणार असून, त्यामुळे उद्योग, व्यापार, शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा मिळणार आहे.
शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या कामातील सर्व प्रमुख अडथळे दूर झाले असून आता कामाला वेग मिळणार आहे. प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आयटी पार्क प्रकल्पाबाबतही सकारात्मक प्रगती झाल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. जलसंपदा विभागाकडील आवश्यक जागेचे हस्तांतरण पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील मोठा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून, सोलापूरमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उजनी धरणातील वाढता पाणीसाठा, शेतीपंपांसाठी वाढीव वीजपुरवठा, विमानसेवेचे पुनरुज्जीवन तसेच उड्डाणपूल आणि आयटी पार्क या विकासकामांना मिळालेली गती यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला नवसंजीवनी मिळणार असल्याचा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
Post Views: 19