टेंभुर्णी – भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची आवक वेगाने वाढत असल्याने पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मंगळवारी मोठी वाढ करण्यात आली आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून ६०,००० क्युसेक्स तर वीजगृहातून १,६०० क्युसेक्स असा एकूण ६१,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. दौंड नदी मापन केंद्रावरून धरणात ५५,५८७ क्युसेक्स पाणी येत असून नदीची पाणीपातळी ५०१.११० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. धरणाची सुरक्षितता आणि पूर नियंत्रण लक्षात घेऊन धरण व्यवस्थापन विभागाने विसर्गात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार उजनी धरणाची पाणीपातळी (RWL) ४९६.८२० मीटर इतकी झाली असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा १,५१३.८५ दशलक्ष घनमीटर (५३.४६ टीएमसी) आहे. धरणाची उपयुक्त साठा क्षमता ९९.७८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ३,३१६.६६ दशलक्ष घनमीटर (११७.११ टीएमसी) असून जलसाठा क्षेत्र ३३६.०७ चौ.कि.मी. इतके झाले आहे.
धरणातून सध्या भीमा नदीपात्रात ६१,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच मुख्य कालव्यातून २,५०० क्युसेक्स, टनेलमधून ९०० क्युसेक्स, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून २८० क्युसेक्स आणि दहीगाव उपसा सिंचन योजनेतून ९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात असून पाण्याची आवक कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ केली जाऊ शकते, असा इशाराही धरण प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट………………..
*प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*.
उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने आलेगाव, रुई, टाकळी, आलेगाव बु., रांजणी, गारअकोले, शेवरे, बेंबळे, मिटकलवाडी तसेच भीमा नदीकाठच्या इतर गावांतील नागरिकांनी विशेष सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाणे टाळावे.
मासेमारी, पोहणे अथवा इतर कारणांसाठी नदीत उतरू नये.
नदीपात्रातील जनावरे, शेती साहित्य, मोटारी, पंप व इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात.
सखल भागातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
धरण व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार विसर्गात बदल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
— सु. उ. डुंबरे
कार्यकारी अभियंता
उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर
Post Views: 12