सोलापूर – सोलापूरच्या विधी क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरत, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. लक्ष्मण मारडकर यांची महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तसेच लॉयर्स चेंबर्सचे विद्यमान अध्यक्ष असलेल्या अॅड. मारडकर यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील नोटरी क्षेत्राला अनुभवी व अभ्यासू नेतृत्व लाभल्याची भावना विधी क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
अॅड. मारडकर यांनी न्यायालयीन कामकाजातील प्रदीर्घ अनुभव, कायद्याचा सखोल अभ्यास, संघटनात्मक नेतृत्व आणि कनिष्ठ वकिलांना सातत्याने केलेले मार्गदर्शन यामुळे विधी क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे प्रभावीपणे कार्य केले आहे.
सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी वकिलांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला. बार आणि न्यायालयीन यंत्रणेमधील समन्वय, व्यावसायिक शिस्त आणि संघटनात्मक एकात्मता वाढविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सध्या लॉयर्स चेंबर्सचे अध्यक्ष म्हणूनही ते युवा वकिलांना मार्गदर्शन, व्यावसायिक नैतिकतेचा प्रचार आणि न्यायव्यवस्थेबाबतची बांधिलकी दृढ करण्यासाठी सक्रिय आहेत.
महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून राज्यभरातील नोटरी सदस्यांच्या समस्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, नोटरी क्षेत्र अधिक सक्षम करणे, संघटना बळकट करणे आणि विधी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणे यावर त्यांचा विशेष भर राहणार असल्याचे विधी क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
या नियुक्तीबद्दल राज्यभरातील ज्येष्ठ विधीज्ञ, बार असोसिएशनचे पदाधिकारी, नोटरी आणि वकिलांकडून अॅड. मारडकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अॅड. जेवा सय्यद, अॅड. नवनाथ अवताडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
अॅड. मारडकर यांच्या नियुक्तीमुळे सोलापूरच्या विधी क्षेत्राचा राज्यस्तरावर गौरव वाढला असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ महाराष्ट्रातील नोटरी व्यवस्थेला होईल, असा विश्वास विधी क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.
Post Views: 32