सोलापूर – येथील संध्याराणी बंडगर यांची २ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पोर्तुगाल (लिस्बन ) येथे होणा-या आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने आयोजित केलेल्या मास्टर वर्ल्ड टूर टीम चैम्पियनशिप स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणा-या ४५ वर्षापुढील वयोगटातील महिला संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
सौ.संध्याराणी यांनी सन २०२५ व २०२६ मधे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने सोलापूर, डेहराडून व इंदौर येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभाग नोंदवून विजेतेपद पटकावले होते . त्यांच्या या यशामुळे त्यांच्या वैयक्तिक गुणात वाढ केली. सध्या १३०० गुणांसह त्यांना अखिल भारतीय स्तरावर प्रथम मानांकन प्राप्त असून जागतिक स्तरावर त्या ३२व्या स्थानावर आहेत.
संध्याराणी या विभागीय वन अधिकारी , सामाजिक वनीकरण खात्यात मुख्य लेखापाल पदावर कार्यरत असून त्यांना लक्ष्मण आवारे, डीएफओ यांचे सहकार्य तसेच महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे संयुक्त सचिव राजीव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
संध्याराणी बंडगर यांना बालाजी अमाईन्स लि. व प्रिसिजन फाउंडेशनकडून आर्थिक सहाय्य लाभले. त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी, संघटनेचे सह सचिव पंकज शहा, कोषाध्यक्ष दिलीप अत्रे, उपाध्यक्ष दिलीप बचुवार यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
Post Views: 12